अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन…

महाराष्ट्र

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या साडीने काल एका कार्यक्रमात पेट घेतला होता, या बातमीने सर्वांची काळजी वाढवली असताना त्यांचे बंधू आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतःच्या अपघाताची माहिती दिली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, काल दिवसभरात मी दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिथेच बंद झाली. अंधार गुडूप. चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट धाडकन खाली आली. थोडक्यात वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो.

बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितले नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच याची ब्रेकिंग न्यूज झाली असती. हार्डीकर डॉक्टर यांना थोडे लागले. मात्र, सर्व सुखरुप आहोत,” असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.