मनोज जरांगे पाटीलांवर अमोल खुणेचा खळबळजनक आरोप; एसआयटी चौकशी व नार्को टेस्टची मागणी

महाराष्ट्र

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत त्यांचा जुना सहकारी आणि घातपाताच्या प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने खळबळजनक दावे केले आहेत. नुकतीच जामिनावर सुटका झाल्यानंतर खुणेने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत थेट मनोज जरांगे पाटील आणि स्वतःची एसआयटी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात खुणेने म्हटलं आहे की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सर्व घडामोडींची मला सखोल माहिती आहे. योग्य वेळी सर्व काही बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्याने दिला आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल खुणेने मोठा गौप्यस्फोट केला. “कोपर्डी प्रकरणातील आरोपीला मारलं नाही तर मी फाशी घेईल, असं मनोज जरांगे पाटील आम्हाला म्हणाले होते. त्यामुळेच आम्ही कोपर्डी प्रकरणातील आरोपीला मारलं,” असा गंभीर आरोप खुणेने केला आहे. “कोपर्डी प्रकरणात मी शिक्षा भोगली आहे, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कोणतीही शिक्षा भोगलेली नाही,” असंही तो म्हणाला.“जर माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण तो सिद्ध झाला नाही, तर त्याचे परिणाम मनोज जरांगे पाटील यांना भोगावे लागतील,” असा थेट इशाराही खुणेने दिला.

पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर बोलताना खुणे म्हणाला की, “माझ्यावर जे आरोप झाले आहेत आणि मनोज जरांगे पाटील जे आरोप करत आहेत, त्या सर्व पार्श्वभूमीवर आमच्या दोघांचीही नार्को टेस्ट व्हावी. तसेच या प्रकरणात ईडी, सीबीआयसह सर्व शक्य त्या चौकश्या लावण्यात याव्यात.”अमोल खुणेच्या या आरोपांमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.