महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

मुंबई: अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केलेला आरोपी हा विधिमंडळाच्या परिसरात कसा फिरू शकतो? असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी सदर आरोपीला तात्काळ विधानभवनाच्या बाहेर काढून त्याला अटक करावी अशा सूचना आज विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

सन्माननीय सदस्य मा. श्री. राम शिंदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत, अकोला येथील अनुसूचित जामातीच्या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी अन्य राजकीय व्यक्तींसोबत विधानभवनाच्या परिसरात फिरताना दिसत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबतची गंभीर दखल घेत उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, सदरचे प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. ही व्यक्ती आपले काम व्हावे म्हणून दबाव आणत आहे. त्यामुळे सरकारने अकोला पोलीस अधीक्षकांसोबत तात्काळ बोलून त्या व्यक्तीला विधानभवनाच्या बाहेर काढावे आणि या महिलेला पोलीस संरक्षण देण्यात यावे.

तसेच सदर महिलेला सरकारी वकील मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने त्याबाबतही योग्य ती कार्यवाही करावी असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

यावेळी महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदर प्रकरणाच्या चर्चेवेळी सभागृह संपायच्या आत निवेदन केले जाईल, असे सभागृहाला सांगितले होते. त्यानुसार सदर आरोपी विधानभवनातून पसार झाला असून त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत, असे सभागृहाला निवेदनाच्या माध्यमातून सांगितले.