अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधीपक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

पुणे: पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये काही विकासासाठी पूरक विधेयकही मंजूर झाली. पूर्ण काळ चाललेल्या अधिवेशनात राजकीय मुद्यांवर काही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये विसंवाद होवू नये म्हणून उपसभापती या नात्याने दोन्ही बाजूशी संवादाच्या माध्यमातून सांगड घालत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडल्याची भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ दरम्यान मुंबई येथे संपन्न झाले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात झालेल्या कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन आज, शुक्रवार (दि.१ १) पुणे येथे युवासेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी डॉ. गोऱ्हे यांनी संवाद साधला.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र विधानपरिषदेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र कोरोनामुळे त्याबाबतचा कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे अधिवेशनात यासंदर्भातील बैठक घेण्यात आली. त्यामध्ये परिषदेबाबत माहिती देणारे ‘कॉफी टेबल बुक’ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु यांना बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सकारत्मक चर्चा झाली. यासोबतच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, राज्यातील देवस्थानांच्या विकासासंदर्भात, महिलांच्या प्रश्नांबाबत बैठक घेण्यात येऊन त्यासंदर्भातील योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यासोबतच MPSC च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आयोगाच्या सचिव आणि इतर सदस्यांना बोलावून आमदारांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक घेण्यात आली. यामध्ये कोर्टात प्रलंबित असणाऱ्या विषयांची माहिती देण्याचे निर्देश दिले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच राज्यातील मंदिरांच्या ट्रस्ट वरती महिला सदस्यांना अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबतची सूचना मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना केली असून त्याबाबत त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच पुणे जिल्ह्यातील जेजुरी देवस्थानच्या संदर्भात लवकरच पुणे विभागीय आयुक्तांशी बोलणार असल्याचे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

पुणे शहरातील वाहतुकीसंदर्भातील प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली. सध्या प्रत्येक महापालिकेवर प्रशासक आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधीचे मत विचारात घेतले जात नाही. याबाबत सगळ्या लोकप्रतिनिधींनी मिळून निवडणूक आयोगाकडे जाऊन निवडणूक घेण्यास सांगण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे एकमत झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रम प्रसंगी, पुणे शहर संघटक लीना पानसरे, पूजा रावेतकर, सुनीता मोरे, श्रुती नाझीरकर, बाळासाहेब चांदेरे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. उपसभापती महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी किरण काकडे यांनी केले.