पैठण: पैठण येथे सुरू असलेल्या संत एकनाथ महाराज षष्ठी महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आज सकाळी गोदावरी नदीपात्रात दुर्दैवी घटना घडली. सिल्लोड तालुक्यातील एका ६० वर्षीय वारकऱ्याचा पवित्र स्नानासाठी नदीत उतरले असताना बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील श्री क्षेत्र मुक्ताई संस्थान (हाळदा) येथील दिंडी पैठण येथे दाखल झाली होती. या दिंडीतील वारकरी बाबुराव रुद्राजी बगळे (वय ६०) हे आज (१० मार्च) सकाळी सुमारे आठ वाजता गोदावरी नदीत स्नानासाठी उतरले. मात्र नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात ओढले गेले. सोबत असलेल्या वारकऱ्यांनी आरडाओरडा करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे ते क्षणार्धात दिसेनासे झाले.
घटनेची माहिती मिळताच पैठण येथील बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेतली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र अधिकारी विजय राठोड, जवान मच्छिंद्र जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बगळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.नाथषष्ठी महोत्सवानिमित्त पैठणमध्ये लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने गोदावरी नदीपात्रात स्नान करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.