कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; महिलेसह दोन अल्पवयीनांवर गुन्हा

क्राईम महाराष्ट्र

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (६ मार्च) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचा पुतण्या कोंढवा खुर्द येथील मक्का ओम सोसायटी परिसरातून दुचाकीवरून जात होता. यावेळी रस्त्यावरून जाताना त्याचा काही जणांशी वाद झाला. “कट का मारला?” या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणांतच तो वाढत गेला.

यानंतर एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांनी त्या तरुणाला थांबवून त्याच्यावर हल्ला केला. तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. मारहाण करताना तरुणाच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या कोंढवा पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खोपडे करत आहेत. किरकोळ वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत प्रकरण गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.