बावनकुळे आणि फडणवीस राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करत आहेत…

महाराष्ट्र

मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना भाजपसोबत युती मान्य होती परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री मान्य नव्हते असे वक्तव्य केले आहे त्यावर महेश तपासे यांनी जोरदार टीका केली आहे.

काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांचा आशिर्वाद होता असे वक्तव्य केले आणि म्हणून ते मुख्यमंत्री पुन्हा झाले याची आठवणही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना करुन दिली आहे. बावनकुळे आणि फडणवीस या दोघांची वक्तव्ये परस्परविरोधी आहे. या दोघांमध्ये कोण खरं बोलतंय हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादीने जवळ केलेले नाही आणि करणारही नाही. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबतच राष्ट्रवादी आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.