संभाजीनगरातील ग्रीन झोनमध्ये बांधलेल्या 75 हजार मालमत्ता होणार नियमित…

महाराष्ट्र

संभाजीनगर: छ. संभाजीनगर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीचा ईएलयू (सध्या असलेल्या जमिनीचा) नकाशा सोमवारी मनपा प्रशासकांसमोर सादर करण्यात आला. तेव्हा शहरातील ग्रीन झोनमधील सुमारे ७५ हजार मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला.

सन १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाल्यावर आसपासची १८ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र गेल्या २० वर्षांत विकास आराखडा तयार न झाल्याने ग्रीन झोनमधील घरे नियमीत झाली नसल्यामुळे त्यांच्याकडून मनपाला कुठलेही उत्पन्न मिळाले नाही. आता ही घरे नियमित करताना त्यांना रेडीरेकनर दराप्रमाणे शुल्क भरावे लागेल. शिवाय वेगळे बेंटरमेंट शुल्कदेखील द्यावे लागेल.

नियमित करण्यासाठी प्रति घर ३० हजार रु. खर्च येईल…

१० हजार घरे गुंठेवारीत नियमित केल्यावर मनपाला त्यातून १२० कोटींचा महसूल मिळाला. आणि जर ७५ हजार घरे नियमित केल्यास किमान एक हजार कोटींचा महसूल मिळेल. विकास आराखड्यानुसार डी. पी. रोडवरील अनधिकृत बांधकामे, खुल्या-आरक्षित जागांवरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ग्रीन झोनमधील मालमत्ता नियमित केल्यास अंदाजे तीन लाख लोकांचा फायदा होणार आहे.