सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर सावध राहा…

महाराष्ट्र

तुमच्या मेंदूवर होतोय दुष्परिणाम… 

औरंगाबाद: आजकाल स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या वापराचे अनेक दुष्परिणामही असल्याचे अनेक संशोधनातुन समोर आलं आहे. यातीलच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेंदूवर (Brain) होणारा वाईट परिणाम. होय, हे खरं आहे. वारंवार फोन चेक करण्याची सवय ही मेंदूसाठी घातक ठरु शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर संशोधन केले.

संशोधनात नेमंक काय?

ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, फोन वारंवार चेक केल्याने दैनंदिन जीवनातील लहान-लहान समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ शकते. सतत फोन तपासण्याच्या सवयीमुळे त्वरित निर्णय घेण्याची वृत्ती कमकुवत होऊ शकते. वारंवार फोन चेक केल्याने स्क्रीन टाइम वाढल्याने ते डोळे आणि मेंदू दोन्हीसाठी घातक आहे

मेंदूशी निगडीत समस्या

सतत स्मार्टफोन वापकल्यामुळे मेंदूवरील नियंत्रण कमी होत असून, काम अपूर्ण सोडणे, मन किंवा मेंदू विचलित होणे अशा समस्या वाढू लागल्या आहेत. स्मार्टफोन वापरण्याच्या सवयीमुळे लोक बोलत असताना शब्द विसरायला लागतात. या संशोधनाचे मुख्य संशोधक आंद्रे हार्टांतो यांच्या मते, स्मार्टफोनमुळे जरी काही कामे सोपी झाली असली तरी, आता लोकांना नकळतपणे गरज नसतानाही स्मार्टफोन तपासण्याची सवय लागली आहे.

कामावर लक्ष नसणे

स्मार्टफोनशी संबधित अभ्यासासाठी संशोधकांनी आयफोन वापरकर्त्यांची निवड केली. हे लोक मोबाईल वापरण्याच्या पद्धती, एकूण वेळ आणि किती वेळा मोबाईल वापरतात याचा तपास करण्यात आला. आठवडाभर अॅपच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलवर नजर ठेवण्यात आली आणि असे आढळून आले की, जे लोक वारंवार फोन तपासतात त्यांची अनेक कामे अपूर्ण राहतात. याचे कारण म्हणजे अशा लोकांचा फोकस ढासळणे हे होय. अशा लोकांना संभाषणादरम्यान योग्य शब्द वापरता येत नाहीत, कारण ते बोलत असताना शब्द विसरतात.

स्मार्टफोनमुळे गेली दृष्टी

मोबाईलच्या वापरामुळे हैदराबादमधील एका 30 वर्षीय महिलेला तिची दृष्टी गमवावी लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ही महिला आपला फोन बराच काळ अंधारात वापरत होती. यामुळे दीड वर्षापासून महिलेची दृष्टी गेली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्या महिलेला अंधुक दृष्टी, तेजस्वी प्रकाशात अडचण, कधीकधी वस्तू पाहण्यात किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत होती.