पुणे: महापालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपकडून मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याचवेळी कॉंग्रेस पक्षानेही विरोधी भूमिका कायम ठेवत दोन्ही पदांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीत मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत महापालिकेवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. मंगळवारी महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार भाजपकडून महापौर पदासाठी मंजूषा नागपुरे, तर उपमहापौर पदासाठी भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केले.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षानेही महापालिकेत विरोधी भूमिका कायम ठेवत महापौर पदासाठी अश्विनी लांडगे, तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांना उमेदवारी दिली. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या नावांची घोषणा केल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार की नाही, याबाबत मंगळवारी सकाळपासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी “राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत म्हणजे भाजपला मत,” असे विधान करत टीका केली होती. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हालचाली वाढल्या. गटनेते अॅड. निलेश निकम, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि आमदार चेतन तुपे यांच्यात बैठक झाली. पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापौर पदासाठी शीतल सावंत, तर उपमहापौर पदासाठी दत्ता बहिरट यांची नावे निश्चित करण्यात आली. सावंत आणि बहिरट यांनी तात्काळ आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सुरुवातीला ही निवडणूक केवळ औपचारिक ठरेल, असे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नाट्यमय निर्णयामुळे ही निवडणूक आता तिरंगी लढतीत रूपांतरित झाली आहे.
राष्ट्रवादी लढणार की माघार घेणार?
महापौर व उपमहापौर पदासाठीची मतदान प्रक्रिया येत्या सोमवारी (ता. ९) होणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार की माघार घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.