बिग बॉस मराठी! सोनाली राऊतच्या ‘ॲटीट्यूड’वर रितेश भाऊंचा संताप, थेट नॉमिनेशनचा इशारा

महाराष्ट्र

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला कडव्या शब्दांत सुनावलं आहे.

“हा ॲटीट्यूड घरी ठेवायचा, या घरात नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली.शो सुरू झाल्यापासूनच रितेश भाऊंचा कडक आणि ठाम अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. पहिल्याच आठवड्यात त्यांनी घरातील सदस्यांना स्पष्ट शब्दांत नियम समजावून सांगितले असून, गैरवर्तन करणाऱ्यांची शाळा घेताना ते दिसत आहेत.

टास्क खेळण्यास नकार ठरला कारण

या आठवड्यात कॅप्टन्सी उमेदवारीसाठी ‘शेणाचं दार अन् मेणाचं दार’ हा टास्क देण्यात आला होता. मात्र सोनाली राऊतने हा टास्क खेळण्यास नकार दिला. बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तिला थेट पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट करण्यात आले.

रितेश भाऊंचा थेट सवाल

या मुद्द्यावरून रितेश भाऊ चांगलेच संतापले. ते सोनालीला म्हणाले,“तुम्ही ठरवलं की त्या दाराखाली उभं राहायचंच नाही, मग इथे आलात कशाला? टास्क खेळायलाच ना?”यावर सोनालीने “मला जे वाटलं…” असे म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र रितेश भाऊंनी तिला मध्येच थांबवत ठाम शब्दांत सुनावलं,“ओ एक मिनिट! हा ॲटीट्यूड तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही. इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेशन आहे, पुढच्या वेळी थेट घराबाहेर काढेन.”

घरातील वातावरण तापलं

या घटनेनंतर बिग बॉसच्या घरात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अनुश्री मानेच्या दादागिरीनंतर आता सोनाली राऊतवर झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.रितेश भाऊंच्या कडक भूमिकेमुळे यंदाचा सिझन अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.