रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर बंद म्हणजे बंदच…

महाराष्ट्र

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली असून त्यासाठी ६ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले आहेत. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमानुसार रात्री ११ वाजेनंतर शहर बंद झाले पाहिजे; अशी भूमिका पोलिस आयुक्त लोहिया यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी खालील प्रकारे प्लॅन तयार केला आहे.

सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत ११ वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

रात्री साडेदहा वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे आवाहन करतील.

आवाहनाला प्रतिसाद देऊन जे बंद करतील त्यांचे स्वागत केले जाईल, मात्र जिथे विरोध होईल तेथे कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे.

हॉटेल व्‍यावसायिकांचा विरोध

या निर्णयावरून हॉटेल्स व्यावसायिकांनी नाराजी दर्शवली आहे. तसेच हॉटेल्स व बार सुरू करण्यासाठी राज्य शासनाने रात्री दीड वाजेपर्यंतची मुदत दिली असल्याचे परिपत्रक देखील यावेळी हॉटेल व्यवसायिकांकडून दाखवण्यात आले. अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असल्यास आमच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षा हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केली. तर या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून त्यांना निवेदनही देणार असल्याचे हॉटेल्स व्यावसायिकांनी सांगितले.