मुंबई: राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारने पुन्हा एकदा eKYC प्रक्रियेसाठी पोर्टल सुरू केले आहे. मात्र, ही संधी सर्व अर्जदारांसाठी नसून केवळ ज्या महिलांनी पूर्वी अर्ज भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, त्यांच्यासाठीच उपलब्ध करण्यात आली आहे.
पोर्टलवर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते.” त्यामुळे नवीन eKYC न केलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
३१ डिसेंबर २०२५ नंतर लाभ बंद
३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्यांचे eKYC पूर्ण झालेले नाही, अशा महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक सहाय्याचा लाभ मिळणार नाही. आधार संलग्न बँक खाते आणि योग्य eKYC ही योजनेची अनिवार्य अट असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या महिलांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत किंवा eKYC मध्ये तांत्रिक चुका झाल्या आहेत, त्यांनी तातडीने अधिकृत पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अर्ज दुरुस्तीनंतरच रखडलेली रक्कम खात्यात जमा होणार आहे.
रखडलेले हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता
दरमहा प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला हप्ता जमा होईल, असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र पडताळणी प्रक्रियेमुळे डिसेंबरपासूनचे हप्ते रखडले आहेत.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाचवेळी सुमारे ६ हजार रुपये जमा होऊ शकतात.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरमध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील हप्त्यांची रक्कम अद्याप वितरीत झालेली नाही. नवीन आर्थिक वर्षात रखडलेले सर्व हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.लाभार्थी महिलांनी अधिकृत पोर्टलवरील सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.