मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रिलायन्स रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
तेजस यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे रुग्णालयात उपस्थित असून त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून प्रकृतीची माहिती घेतली. उद्धव ठाकरे यांनी एक-दोन वेळा रुग्णालयात भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
कोण आहेत तेजस ठाकरे?
तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र असून ते व्यावसायिक वन्यजीव संशोधक आणि छायाचित्रकार आहेत. त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नसला तरी विविध सामाजिक आणि पक्षीय कार्यक्रमांना ते उपस्थित राहतात.वन्यजीव संशोधन क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. तामिळनाडूमध्ये भारतीय संशोधकांच्या पथकाने शोधलेल्या गेकोच्या नव्या प्रजातीला त्यांच्या नावावरून नामकरण करण्यात आले होते.
2012 मध्ये अंबोली येथे त्यांनी पहिली ‘हर्पिंग’ मोहीम राबवली होती. त्या मोहिमेदरम्यान एका नव्या माशाच्या प्रजातीचा शोध लागला. पुढे या प्रजातीला ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ असे नाव देण्यात आले. या प्रजातीच्या संवर्धनासाठी त्यांनी आवश्यक परवानग्या घेऊन सविस्तर दस्तऐवजीकरणही केले.तेजस ठाकरे यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना, “मला राजकीय सभा आणि गर्दीपेक्षा जंगल अधिक आवडते,” असे मार्मिक वक्तव्य केले होते.सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून समर्थकांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.