महिलांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत; शक्ती कायदा लवकरच; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली. महिलांच्या सुरक्षेसह सन्मान, संधी आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

महिला दिनानिमित्त विधानपरिषदेत झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना पवार यांनी सांगितले की, राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘शक्ती कायदा’ लवकरच संमत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महिलांवरील गुन्ह्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे हा या कायद्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘कम अर्ली-गो अर्ली’ धोरण लागू

मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली. या निर्णयानुसार महिला कर्मचारी सकाळी 9.15 ते 9.45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी काम करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची सवलत मिळणार आहे. साधारणपणे ३० मिनिटांपर्यंत लवकर घरी जाण्याची मुभा देण्यात येणार असून यामुळे गर्दीच्या वेळेत होणारी गैरसोय कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनाबाबत तसेच पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील १७ हजार २५४ अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

महिलांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर

महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली या स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती दिली.महिलांना सुरक्षित, सन्मान्य आणि सक्षम समाजव्यवस्था देण्याचा सरकारचा संकल्प अधिक दृढ असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.