मुंबई: टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून युवक काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले असून सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात जोरदार निदर्शने केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका शनिवारी ठाण्यात फुटल्याने परीक्षा रद्द करावी लागली. त्यामुळे लाखो परीक्षार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला.
युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, राज्यात सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत असून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर टीईटी पेपरफुटीची घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या तीन दिवसांत विविध स्वरूपाची आंदोलने करण्यात आली आहेत. सोमवारी रात्री काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदविला. त्याआधी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले होते.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. तसेच, जोपर्यंत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.