महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार
मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी विचार दिला असून, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे मूलभूत आधार आहेत. जातीपलीकडे जाऊन माणसाला केंद्रस्थानी ठेवणारा महाराष्ट्राचा हा विचार आता देशभर पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात आयोजित ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस अनंत मोहोड, पनवेल जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, काँग्रेस हा सर्व समाजघटकांना समान संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सामाजिक न्यायाचा एल्गार पुकारला आहे. “जिसकी जितनी आबादी, उतनी भागीदारी” या तत्त्वानुसार पक्ष आणि संघटनेत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले जात आहे. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या सामाजिक न्यायाच्या लढ्याला देशभर बळ देण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भानुदास माळी यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, फुले यांचा समतावादी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे सांगितले. या अभियानाची सांगता सातारा जिल्ह्यातील विशेष सभेने होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी तसेच ओबीसी समाजाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.