मुंबई–गोवा महामार्गासाठी ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प; चाकरमान्यांना ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांचे आवाहन

महाराष्ट्र

मुंबई : मुंबई–गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना खड्डे, धूळ आणि वाहतूककोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी यंदा ‘एक गोणी खडी’चा अनोखा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास मुंबई–गोवा महामार्गावरून होतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू असूनही रस्त्याची समस्या कायम असल्याची नाराजी कोकणवासीयांकडून व्यक्त केली जाते.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदार तसेच मंत्री आणि केंद्रातील लोकप्रतिनिधींकडून महामार्ग पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी आश्वासने देण्यात आली. मात्र समृद्धी महामार्ग पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही त्याआधी सुरू झालेला मुंबई–गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असल्याकडे पारकर यांनी लक्ष वेधले आहे.

‘एक गोणी खडी’चा संकल्प

यंदा कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याने शक्य असल्यास वाहनात एक छोटी गोणी खडी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान एखादा खड्डा आढळल्यास आणि परिस्थिती सुरक्षित असल्यास वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून त्या खड्ड्यात खडी टाकावी, असे या आवाहनात म्हटले आहे.

तसेच या उपक्रमाचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर एकगोणीखडी, मुंबईगोवाहायवे, खड्डेमुक्तकोकण आणि चाकरमान्यांचासंकल्प या हॅशटॅगसह पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘सरकारविरोधातील राग नाही, जागे करण्याचा लोकशाही मार्ग’

‘हा सरकारविरोधातील राग नसून सरकारला जागे करण्याचा लोकशाही मार्ग आहे,’ असे पारकर यांनी म्हटले आहे. लाखो चाकरमानी ज्या रस्त्यावरून आपल्या मायभूमीकडे आणि गणरायाच्या दर्शनासाठी जातात, त्या रस्त्याची अवस्था अशी का असावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘सरकारने रस्ता बांधायचा आणि जनतेने खड्डे बुजवायचे, ही वेळच व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

‘गणरायाच्या दर्शनाला जाताना हातात प्रसाद असू द्या आणि वाहनात एक गोणी खडीही असू द्या,’ असा संदेश देत ही चळवळ कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून कोकणातील सुरक्षित प्रवासासाठी असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले आहे.

‘एक गोणी खडी — एक जाब सरकारला! कोकणासाठी… सुरक्षित रस्त्यासाठी… आपल्या चाकरमान्यांसाठी!’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत