माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका…

महाराष्ट्र

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ररअजय सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात आलेलं खोके सरकार हे फक्त मुंबई विरोधी नाही तर महाराष्ट्र विरोधी आहे. मुंबईचा वापर एटीएम म्हणून करत आहेत म्हणत माझी मुंबई विकू नका, तिचं एटीएम करू नका अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ताकीद दिली.

आदित्य ठाकरे यांनी रस्त्याच्या कामाच्या कंत्राटावरुन गंभीर आरोप केलेत. खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरु केली आहे. पाच हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे. ४५० किमी ६०८४ कोटींचं टेंडर आहे, फेब्रुवारीत काम सुरु केलं तरी काम कधी होणार? मुंबईत कामं करण्याचा करण्याचा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो कारण बाकीच्या कालावधीत पाऊस पडतो.

पावसाळ्यानंतर सुरु झालेली कामं पावसाळ्याच्या आधी पूर्ण केली जातात. मात्र आत्ता हाती घेतलेली काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण होतील का? याचा अभ्यास केला गेलेला नाही. तसंच या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करुन देण्यात आला आहे. महापालिकेत कोणतीही बॉडी नसताना महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामं मंजूर कशी केली हा प्रश्न मुख्य आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, जी टेंडरची खिरापत वाटण्यात आली आहे त्या टेंडरचा पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही टेंडर्स काढण्यात आली असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईतलं टेंडर हे इतर राज्यांमधल्या टेंडरपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री आहेत ते मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातले रस्ते काँक्रिटचे का केले गेले नाहीत? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, माझा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. मार्च २०२२ च्या २ हजार कोटींच्या कामाला ३ वर्ष लागणार हे त्यांनी सभागृहामध्ये सांगितलं. मग या सहा हजार कोटींच्या कामाला किती वर्ष लागणार? हे टेंडर स्क्रॅप करून रिकॉल करा ही आमची मागणी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून मोगलाई

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून मोगलाई असल्याची स्थिती आहे. गणेशोत्सवात गोळीबार करणाऱ्या आमदारांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. गद्दार आमदारांकडून कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात अनेक घटना घडल्या आहेत. शिवीगाळ, धमक्या देणं, दादागिरी अशा घटना घडत आहेत. मात्र कारवाई झालेली नाही. स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके या धोरणावर सरकार चाललं आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.