मुंबई: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना राज्यभर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभामध्ये अनियमितता दिसून येत होती.
मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्यात विलंब झाला. त्यानंतर जानेवारी महिन्यानंतर अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नव्हते.
दरम्यान आता यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकदाच जमा करण्यात येणार आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केवायसी न केलेल्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता
या योजनेचा लाभ काही अपात्र महिलांनी घेतल्याचेही समोर आल्यानंतर सरकारने केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे. केवायसी पूर्ण करण्यासाठी लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही महिलांच्या केवायसीमध्ये तांत्रिक चुका राहिल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी आता ३१ मार्चपर्यंत अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे.३१ मार्चनंतर ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा ज्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील, त्यांच्या खात्यातील हप्ता बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नसून पुढेही सुरूच राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिले होते.