मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही…!

महाराष्ट्र

मुंबई: मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. राज्यात नोकरभरतीही होऊ देणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हा आरक्षण परिषदेत देण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी, एल्गार पुकारण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण परिषदेचे आयोजन करण्याबाबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या 50 टक्के आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मराठा समाजाच्या वतीने आजपर्यंत 58 मोर्चे काढून आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. मात्र, न्यायालयात टिकेल, असे आरक्षण मिळालेले नाही. आता निर्वाणीचा इशारा देण्यासाठी राज्यस्तरीय आरक्षण परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा समाज परिषदेचे संयोजक रवी मोहिते यांनी दिली. यावेळी प्रताप कांचन, ऍड. सुरेश गायकवाड, राम गायकवाड, राजन जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस ऍड. श्रीरंग लाळे, विजय मोहिते, भाऊसाहेब रोडगे, श्रीकांत डांगे, विजय पोकरकर, विकास कदम, सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, सुहास कदम, योगेश पवार, शेखर फंड, सदाशिव पवार, बजरंग जाधव, महेश सावंत, किरण पवार, निर्मला शेळवणे, मनीषा नलावडे, उषा गायकवाड, राम साठे, सुरेश ननवरे, सचिन चव्हाण, मिलिंद भोसले, किशोर चव्हाण, अंबादास सपकाळे, अविनाश गोडसे, दिनेश जाधव, बाळासाहेब उबाळे, शिवदास वाडकर, विजय चव्हाण, अनिल मस्के आदी समाज बांधव उपस्थित होते.

18 सप्टेंबरला राज्यस्तरीय आरक्षण परिषद

मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी रविवार, 18 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही आरक्षण परिषद छत्रपती शिवाजी प्रशालेत सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या आरक्षण परिषदेला राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.