नागपुरात ओबीसींचा एल्गार; जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी, स्फोटप्रकरणी कारवाईचा इशारा

महाराष्ट्र

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत आज नागपूरच्या संविधान चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनगणना अर्जात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यास समाजाचे मोठे नुकसान होईल आणि हक्क-आरक्षणासह विविध अधिकारांपासून वंचित राहण्याची वेळ येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या प्रतिनिधित्वावरही गदा येऊ शकते. जोपर्यंत जनगणनेत स्वतंत्र रकाना समाविष्ट होत नाही, तोपर्यंत ओबीसी संघटनांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

स्वतःला ओबीसींचे कैवारी म्हणवणारे पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत केवळ बॅनरबाजीने प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रत्यक्ष न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. सरकारने मागणी मान्य केली नाही तर गावपातळीवर आंदोलन छेडले जाईल. तसेच, ओबीसी रकाना नसल्यास जनगणनेत सहभागी न होण्याचा असहकारही पुकारला जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी १७ कामगारांचा मृत्यू झाल्याबद्दल प्रशासन आणि कंपनी मालक जबाबदार असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. मागील दोन-तीन वर्षांत अशा घटनांत ५० ते ६० जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले. सुरक्षेच्या नियमांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागत असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दारुगोळा व स्फोटक साहित्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे सखोल ऑडिट केल्याशिवाय त्यांना कामकाजास परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. होळीच्या सुट्टीनंतर विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाब विचारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.