कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विदीप जाधव कुटुंबियांना भावनिक सांत्वन

महाराष्ट्र

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात ठेवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे” असे धीराचे शब्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. त्यांच्या या शब्दांनी जाधव कुटुंबियांना मोठा आधार मिळाला. या भावूक प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

कर्तव्यावर असतानाही अत्यंत संयम, करुणा आणि माणुसकीच्या भावनेतून जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वातील मानवी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या भेटीमुळे जाधव कुटुंबियांना मानसिक बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.