आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

महाराष्ट्र

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करून पुण्यात प्रचार केला. महिनाभर शहरात तळ ठोकून त्यांनी झंझावाती प्रचार केला असला, तरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा दुसरा मोठा पक्ष ठरला.

या निकालानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी सक्षम चेहरा निवडण्याचे अधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार पवार यांनी मंगळवारी अ‍ॅड. निलेश निकम यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली. मात्र या निर्णयाबद्दल दादांचे आभार मानण्याची संधी निकम यांना मिळालीच नाही.

महिनाभराचा झंझावाती प्रचार

महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गेल्या महिनाभर पुण्यात मुक्काम करून होते. जनतेकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे पक्षाला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. निकालात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद पक्षालाच मिळाले.

निवडीचा अधिकार दादांकडे

विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची निवड करावी, याबाबत शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते निवडीचा अंतिम अधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. पक्षाकडून तीन ते चार नावे पवार यांच्यासमोर मांडण्यात आली होती. त्यातून पवार यांनी अ‍ॅड. निलेश निकम यांच्या नावाला पसंती दिली.

आभार मानण्याआधीच काळाने घाला घातला

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अ‍ॅड. निकम बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून पवार यांच्याशी संपर्क साधत होते. मात्र पवार यांचा फोन बंद होता. आठ वाजता पुन्हा संपर्क साधल्यानंतर दादा विमान प्रवासात असल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकांकडून देण्यात आली.

काही वेळातच सुनील टिंगरे यांच्याकडून अजित पवार यांच्या निधनाची धक्कादायक बातमी निकम यांना समजली.“मी दादांचे आभार मानण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना फोन करत होतो. मात्र त्यांच्याशी बोलणं झालंच नाही. दादांचे आभार मानायचे राहून गेले,” असे सांगताना अ‍ॅड. निलेश निकम यांचा कंठ दाटून आला.