मुंबई: राज्यातील इंधन वितरणाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस गती देण्यासाठी 1,600 नव्या पेट्रोल पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, आगामी काळात 2,000 नवीन पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
महसूल विभागाने “एक खिडकी योजना” सूरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पेट्रोल पंप मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांचे निराकरण होईल. परवानग्या जलदगतीने मिळणार असल्याने, इच्छुक उद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी आहे!
मुख्य मुद्दे:
1600 नव्या पेट्रोल पंपांना मंजुरी मिळाली
2,000 नवीन पंपांची उभारणी नियोजित
परवानगी प्रक्रिया जलद आणि सोपी होणार
30,000+ तरुणांना रोजगार संधी उपलब्ध
₹3,500 ते ₹4,000 कोटी गुंतवणूक होणार
एक खिडकी योजना म्हणजे काय
पेट्रोल पंप उभारणीसाठी कंपन्यांना महसूल विभाग, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग यांच्याकडून विविध परवानग्या घ्याव्या लागतात. या प्रक्रियेत खूप वेळ जातो. त्यामुळे सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात “एक खिडकी योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व परवानग्या एकाच ठिकाणी आणि जलदगतीने मिळणार* आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की “परवानग्या देताना कमीत कमी अटी-शर्ती ठेवण्यात येणार असून, 3 महिन्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल विभागाला यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.