चाकणच्या रस्त्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात; १६ ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक

महाराष्ट्र

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांत स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

चाकण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून, येथील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे प्राधान्य असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. रस्ते, वाहतूक आणि अन्य पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

उद्योग महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये आणि चाकण परिसरातील रोजगाराच्या संधी कायम राहाव्यात, यासाठी शासन व औद्योगिक क्षेत्रामध्ये समन्वय साधून मार्ग काढला जाणार आहे. औद्योगिक विकासाला गती देतानाच उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून, बैठकीत ठोस निर्णय घेण्याचे संकेत उद्योगमंत्र्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत