वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला! वर्दी फाडून बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम महाराष्ट्र

कल्याण: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर भर चौकात कारमधील त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात घडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसाची वर्दी फाडून बेदम मारहाण केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात विलास सुरेश भागीत (वय 33) हे वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 121(1), 132, 125, 28, 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास भागीत हे गेल्या सहा महिन्यांपासून कल्याण शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. शनिवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ते दुर्गाडी चौकात हवालदार पी. पी. गायकवाड आणि ट्रॅफिक वॉर्डन प्रतीक पवार यांच्यासह वाहतूक नियमनाचे काम करत होते.

याचवेळी कोनगावकडून येणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना MH 05 / CA / 0400 क्रमांकाची मेटॅलिक सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार विरुद्ध दिशेने येत असल्याचे दिसून आले. भागीत यांनी कार थांबवून पुढे जाण्यास मनाई केली असता, कारमधील तिघा तरुणांनी संताप व्यक्त करत शिवीगाळ सुरू केली.

त्यानंतर तिघांनी मिळून भागीत यांच्यावर हल्ला केला. कार चालकाने पाठीमागून पकडून धरले, तर गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेल्या इसमाने बेदम मारहाण केली. तिसऱ्या आरोपीने कॉलर पकडून वर्दी फाडत छाती व पोटावर बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर हल्लेखोर कारसह घटनास्थळावरून फरार झाले.

दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून पोलिस दलात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोर हे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती तपासात समोर आली असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे.कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर भर चौकात झालेल्या या हल्ल्यामुळे गुन्हेगारांना वर्दीचा धाक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.