अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे कोल्हापूरला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल आणि शहरात “विकासाची पंचगंगा वाहणार” असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिराचा विकास प्रकल्प हा केवळ मंदिर परिसराच्या सुशोभीकरणापुरता मर्यादित नसून कोल्हापूरच्या सांस्कृतिक, धार्मिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देणारा ठरेल. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा उल्लेख करत त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर, अयोध्या राम मंदिर आणि उज्जैनमधील महाकाल लोक प्रकल्पांचा संदर्भ दिला. धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमित शहा यांच्या उपस्थितीमुळे या विकासकामाला अधिक बळ मिळाल्याचे सांगत शिंदे यांनी राष्ट्रीय सुरक्षा, सहकार क्षेत्रातील सुधारणा आणि शेतकरी हिताच्या निर्णयांसाठीही त्यांचे कौतुक केले.

राज्य सरकार विविध तीर्थक्षेत्रे, प्राचीन मंदिरे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचे नवे पर्व ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत