केज शहरात अतिक्रमणांवर मोठी कारवाई; प्रशासन ऍक्शन मोडवर

महाराष्ट्र

केज: केज शहरातील रस्त्यांवर शासकीय जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आले आहे.

यासंदर्भात काल वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, केज शहरातील विविध भागांमध्ये शासकीय जागेवर झालेले सर्वच अतिक्रमण सरसकट हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लवकरच ही अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार असल्याने शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास मिळणार आहे.

अतिक्रमणांमुळे रस्त्यांवर सतत होणारी वाहतूक कोंडी, गर्दी आणि अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता प्रशासनाच्या या निर्णायक भूमिकेमुळे या समस्यांवर तोडगा निघणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केज शहरातील सर्वच शासकीय जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, या मोहिमेबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण आहे. रस्ते मोकळे झाल्यास वाहतूक अधिक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.