मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक

महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षण विभागाची स्पष्टता

सोलापूर: इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई)ने २०१० पासून शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ची अट लागू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या कार्यरत असलेल्या व ५३ वर्षांपर्यंत वय असलेल्या शिक्षकांनाही दोन वर्षांच्या आत ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत पात्रता पूर्ण न केल्यास संबंधित शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होऊ शकते.

पदोन्नती आणि वेतनश्रेणीसाठीही ‘टीईटी’ आवश्यक

विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे आवश्यक ठरणार आहे. तसेच शिक्षकांच्या निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीही ‘टीईटी’ची अट लागू करण्यात आली आहे.

याचा परिणाम म्हणून सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत सुमारे ३५ ते ४० शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. १२ ते २० वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या शिक्षकांनाही वेतनश्रेणीसाठी आता ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना उतारवयातही उन्हाळी सुट्टीत ‘टीईटी’चा अभ्यास करावा लागणार आहे.

बीएड असला तरी ‘टीईटी’ अनिवार्य

इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवर माध्यमिक शाळेत नियुक्त बीएडधारक शिक्षकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवृत्तीस पाच वर्षे शिल्लक असलेले शिक्षक वगळता सर्वांना दोन वर्षांच्या आत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे.

राज्य शासनाकडून माहिती मागवली

राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांकडून ‘टीईटी’ उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती मागवली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. दिलेल्या मुदतीत पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे,”

सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर