मनपातील १० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत सामावून घेण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

महाराष्ट्र

ठाणे: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार ही पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिल्या.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील एकूण १,१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज आणि महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेतील १,१९८ कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी मानधनावर, तर काही रोजंदारीवर कार्यरत आहेत. यातील काही कर्मचारी तब्बल २५ ते ३० वर्षांपासून पालिकेच्या सेवेत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी केली होती.

मात्र, महानगरपालिकेचा सध्याचा आस्थापना खर्च एकूण उत्पन्नाच्या ६५.६ टक्के इतका आहे. सर्व १,१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर दरमहा सुमारे १० कोटी ४० लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

ही आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, सध्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, तर उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत नंतर निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरम्यान, महानगरपालिकेने स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, तसेच मालमत्ता कराची प्रभावी वसुली करून नव्या मालमत्तांचा कर आकारणीमध्ये समावेश करावा, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

महानगरपालिका प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे. या माध्यमातून आगामी काळात पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होईल, अशी माहिती आयुक्त संजिता महापात्र यांनी बैठकीत दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत