मोरबी नदीवरील झूलता पुल कोसळल्याने नदीत बुडून 134 हुन अधिक लोकांचा मृत्यू…

महाराष्ट्र

गांधीनगर: गुजरातमध्ये रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याने नदीत बुडून आतापर्यंत 134 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. इतकी मोठी दुर्घटना नेमकी कशी घडली? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या पुलावर जाण्यासाठी 675 लोकांना तिकीटं दिली गेली होती. पुलाच्या एकूण क्षमतेच्या चार पट जास्त तिकीट दिली गेली होती. यामुळे पुलावर मोठी गर्दी झाली होती आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक यावेळी याठिकाणी होते, अशी मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा मोरबीचा झुलता पूल तब्बल 140 वर्षे जुना आहे. हा पूल इंग्रजांच्या काळातील असून त्याचं निर्माण 1887 मध्ये मोरबीचे तत्कालीन राजे वाघजी रावाजी ठाकोर यांनी केलं होतं. जो एक उत्तम टुरिस्ट स्पॉट बनला होता. गेल्या काही वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. दुरुस्तीच्या कामासाठी मागील जवळपास 7 महिन्यांपासून हा पूल पर्यटकांसाठी बंद होता. दुरुस्तीनंतर पाच दिवसांपूर्वीच हा पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.

गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू, तर…

बऱ्याच काळानंतर हा पूल पर्यटनासाठी खुला झाल्याने लोकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त तिकीटं देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. 140 वर्षे जुन्या पुलाची दुरुस्ती करणाऱ्या ओरेवा कंपनी आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम 304, 308, 114 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मोरबीच्या या ऐतिहासिक पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीचं टेंडर नुकतंच ओरेवा नावाच्या कंपनीला मिळालं होतं. निविदेतील अटींनुसार कंपनीने दुरुस्तीनंतर पुढील 15 वर्षे पुलाची देखभाल करायची होती.