१९ जिल्ह्यांतील पीक, चारा आणि पाणीस्थिती चिंताजनक; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घेण्याची भूमिका
मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शिबीर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
राज्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सरकारच्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे. १९ जिल्ह्यांमध्ये पिकांची अवस्था, चारा उपलब्धता आणि पाणीस्थिती चिंताजनक असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे राज्यव्यापी शिबीर घेण्याऐवजी शेतकऱ्यांच्या अडचणींना प्राधान्य देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने घेतली आहे.
परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राज्यव्यापी शिबीर आयोजित करण्यात यावे, अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणारे शिबीर तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, दुष्काळाच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या परिसरात प्रशासनासोबत समन्वय साधून पुढाकार घ्यावा, तसेच आवश्यक उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत.
शेतकरी आणि ग्रामीण भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासनाच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.