नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

महाराष्ट्र

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे आज एका वेगळ्या आणि लक्षवेधी भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र ही भेट केवळ राजकीय नव्हती, तर कलारसिकतेचा सुंदर संगम ठरली.

नंदनवन बंगल्यात लावण्यात आलेली मुंबईतील हेरिटेज वास्तूंची दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहताना राज ठाकरे अक्षरशः भारावून गेले. प्रत्येक छायाचित्र बारकाईने न्याहाळत त्यांनी त्या वास्तूंसंबंधीच्या आठवणी सांगितल्या. मुंबईच्या ऐतिहासिक वारशाबद्दलची त्यांची जाण आणि जिव्हाळा यावेळी प्रकर्षाने जाणवला.

या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. नंदनवन इमारतीचा हेरिटेज लूक जपत परिसरातही त्याच धाटणीची रचना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. हेरिटेज इमारतींना प्रोत्साहन मिळावे आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी आपण मुख्यमंत्री असताना धोरण आखले होते, असेही त्यांनी नमूद केले.

राज ठाकरे स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार आणि कलेचे चोखंदळ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. राजकीय धावपळीच्या वातावरणातही ऐतिहासिक ठेव्याचे जतन आणि कलात्मक मांडणीचे त्यांनी केलेले कौतुक विशेष ठरले.राजकारणाच्या पलीकडे जाऊन वारसा, वास्तुशिल्प आणि कला यांवर रंगलेली ही भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.