दादांच्या आवाजातील बनावट एआय क्लिप्स प्रकरण; जबाबदारांवर कडक कारवाई करणार; सुनील तटकरे 

महाराष्ट्र

मुंबई: आदरणीय दादांच्या आवाजात खोटी व दिशाभूल करणारी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून, संबंधितांनी अशा एआय-निर्मित (AI-generated) बनावट क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिला आहे.

तटकरे यांनी स्पष्ट केले की, काही स्वार्थी प्रवृत्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेमध्ये दादांबद्दल प्रचंड आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

मृत नेत्याच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर करणे हे अत्यंत नीच आणि निंदनीय कृत्य असून, दोषींवर सायबर कायदे तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहनही तटकरे यांनी नागरिकांना केले आहे.

दिवंगत अजितदादा पवार हे राज्यातील लोकप्रिय नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने खोटा प्रचार करणे हे सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे. संबंधितांनी हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.