शिर्डीच्या साई मंदिरात आता ‘नो मास्क नो दर्शन’

महाराष्ट्र

अहमदनगर: शिर्डीत साईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती कपण्यात आलेली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात ‘नो मास्क नो दर्शन’ नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून कोरोनाचा नवीन व्हेरिअंट JN 1च्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला येत असतात. मात्र आता कोरोनाच्या जेएन.1 (JN.1) या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. या पार्शवभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही.

तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेशद्वाराजवळ मास्क उपलब्ध करून द्यावे अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यामुळे आता साईभक्तांना मास्क बंधनकारक असणार आहे.