तलाठी भरतीची प्रक्रिया 15 मार्चपासून सुरू होईल

महाराष्ट्र

औरंगाबाद: राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली असून राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये चार हजार तलाठी पदांची भरत करणार असल्याचं राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले होतं. दरम्यान, आता राज्यातील या तलाठी भरतीसंदर्भात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध सरकारी विभागांत अनेक वर्षांपासून ‘गट क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास सरकारने मान्यता दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी भरतीची चार हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेला सरकारने हिरवा कंदील दिला. ही तलाठी भरती प्रक्रिया १५ मार्चपासून सुरू होणार असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं.