रांजणगाव MIDC मधील कंपनीत 11 लाखांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीला ठोकल्या बेड्या

क्राईम मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC मधील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करुन 11 लाख 20 हजार 980 रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य दि 19 ते 20 डिसेंबर 2023 च्या दरम्यान चोरीला गेले होते. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीतील मशिनचे साहित्य चोरी करणा-या चार आरोपींचा तपास करत रांजणगाव MIDC पोलीसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 19 ते 20 डिसेंबर 2023 च्या दरम्यान रांजणगाव MIDC तील पेप्सीको इंडीया होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत अ ज्ञात व्यक्तींनी स्टोअर रुममधील खिडकीचा कोयंडा तोडुन खिडकीतुन आत प्रवेश करत 11 लाख 20 हजार 980 रुपये किंमतीच्या चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनच्या साहित्याची चोरी केली होती. याबाबत कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने प्रविण अशोक बारी सध्या (रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे). मुळ रा. शिंदोणी, ता. जामनेर, जि.जळगाव यांनी दि. 23 डिसेंबर 2023 रोजी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

 

सदरचा गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखुन अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गावारी यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल आणि आरोपींचा शोध घेण्याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक ढवाण यांनी सदरचा गुन्हा उघडीकिस आणण्यासाठी स्वतंत्र तपास पथकाची नेमणुक करुन त्यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

 

पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ यांनी औद्योगीक वसाहतीमधील तसेच कारेगाव परिसरातील 30 ते 40 ठिकाणावरील सी.सी.टि.व्हि. कॅमेरे चेक करुन आरोपीनी गुन्हा केल्यानंतर जातांना वापरलेल्या स्कुटी मोटार सायकलचा पाठपुरावा केला. तसेच गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाने आरोपी 1) विजय पांडुरंग पाटिल (वय 36) रा. मोरगाव खुर्द, ता. रावेत, जि. जळगाव, 2) भुषण संतोष मिस्त्री (वय 29) रा. निंभोरा, ता. जि. बु-हाणपुर, मध्यप्रदेश 3) मुकेश पिरमु धृवे (वय 29) रा. चंदनगाव, ता. जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश तिघेही सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली आहे.

 

या आरोपीना दि. 26 डिसेंबर 2023 रोजी वरील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना शिरुर न्यायलयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच वरील तीन आरोपीनी चोरलेले साहित्य हे सुनिल मांगीलाल महाजन (वय 48) रा.अमरदिप सोसायटी कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे याला विकले असुन सदर आरोपीस दि. 28 डिसेंबर 2023 रोजी अटक करण्यात आलेली आहे. तसेच अटक आरोपीकडुन गुन्हयात चोरीस गेलेले 11लाख 20 हजार 980 रुपये किंमतीचे चिप्स बनविण्यासाठी लागणा-या मशीनचे साहित्य व गुन्ह्यात वापरलेली स्कुटी मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.

 

सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुण्याचे अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगावचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, माणिक काळकुटे यांनी केली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे हे करत आहेत.