कोल्हापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी वादात
कोल्हापूर: कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पीडित विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींमध्ये जोशी यांच्या वागणुकीबाबत धक्कादायक बाबी उघड झाल्या असून, या प्रकरणामुळे महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, प्रा. जोशी विद्यार्थिनींना “केबिनमध्ये एकटीच ये, तुला समजून सांगतो,” असे सांगून बोलवायचे. विद्यार्थिनी भेटायला आल्यावर त्यांच्या अवयवांबाबत अश्लील भाष्य करणे, वाईट नजरेने पाहणे आणि अभ्यासाबाबत मार्गदर्शनाच्या बहाण्याने चुकीचा स्पर्श करणे, अशा प्रकारचे प्रकार त्यांनी केल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे तर काही विद्यार्थिनींना फोन करून लज्जास्पद बोलणे, तसेच या प्रकाराबाबत कुठे तक्रार केल्यास हजेरी कमी दाखवणे किंवा विषयांतर्गत कमी गुण देण्याची धमकी देऊन दबाव आणला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, प्रा. जोशी यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सकाळी नऊ वाजता उपस्थिती लावल्यानंतर ते दिवसभर महाविद्यालयात नसून बाहेर फिरणे किंवा घरी थांबणे आणि संध्याकाळी पुन्हा हजेरी लावण्यासाठी येणे, अशी त्यांची पद्धत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांच्या या मनमानी कारभारावर प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
महाविद्यालयातीलच एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याशी जोशी यांचे नाते असल्याने त्यांना संस्थेमध्ये संरक्षण मिळत असल्याची चर्चा महाविद्यालयीन वर्तुळात सुरू आहे. तसेच काही प्राध्यापकही त्यांच्या पाठीशी असल्याची कुजबूज आहे.
पेटंट आणि डॉक्टरेटवरही प्रश्न
प्रा. जोशी यांच्या नावावर तब्बल 21 पेटंट असल्याचे सांगितले जाते. संशोधन आणि परिश्रमातून पेटंट मिळवावे लागतात, त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने पेटंट कशा पद्धतीने मिळाली याची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी काही शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे. त्यांच्या डॉक्टरेट पदवीबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.
कॉपी प्रकरणातून सुटका झाल्याची चर्चा
जोशी हे संबंधित महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना परीक्षेत कॉपी करताना त्यांना पकडण्यात आल्याचेही समोर येत आहे. त्या वेळी दबाव टाकून आणि ओळखींचा वापर करून त्यांनी त्या प्रकरणातून सुटका करून घेतल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर काही माजी वर्गमित्रांनीही त्यांच्या पूर्वीच्या वर्तनाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
तक्रार निवारण समितीतच सदस्य
महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती असतानाही प्रा. जोशी हे त्याच समितीचे सदस्य असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तक्रार करायची तर त्याच समितीत आरोपी असणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही विद्यार्थिनींना तक्रार केल्यास मदत मिळणार नाही, असा दबाव टाकला जात असल्याचेही आरोप आहेत.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनी आणि शिक्षकांकडून होत आहे.