राजकीय भूकंप! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र राजकीय

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून आज सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार असून, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाबाबत सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या महत्त्वाच्या बैठकीनंतरच उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून, दोन्ही नेत्यांमध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. उद्या होणाऱ्या आमदारांच्या बैठकीत गटनेत्याची निवड, गटनेता निवडीची प्रक्रिया आणि पुढील राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे.एकूणच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदामुळे राज्याच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार असल्याचं चित्र आहे.