कोडोली–कुंभोजमध्ये जनसुराज्यचा दबदबा
पन्हाळा: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांना त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सातवे आणि पोर्ले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा धक्का बसला आहे. मात्र, कोडोली, कुंभोज आणि टोप परिसरात जनसुराज्यने आपले वर्चस्व कायम राखत ताकद दाखवली आहे.
सातवे आणि पोर्लेत राष्ट्रवादीची मुसंडी
आमदार विनय कोरे यांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. पोर्ले येथे राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागांवर वर्चस्व मिळवले. हा पराभव कोरे यांच्यासाठी या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विजय मिळवला. तसेच सातवे आणि माले या दोन्ही पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
कोडोली आणि कुंभोजमध्ये जनसुराज्यचा झेंडा
जरी काही ठिकाणी पराभव पत्करावा लागला असला तरी जनसुराज्य शक्ती पक्षाने इतर महत्त्वाच्या मतदारसंघांत आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य पुरस्कृत अमरसिंह पाटील यांनी विजय मिळवत आपली बाजू भक्कम केली.
कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्यच्या शीतल प्रवीण यादव यांनी तब्बल १९७४ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.
पंचायत समितीत जनसुराज्यची प्रभावी कामगिरी
पंचायत समिती निवडणुकांमध्येही जनसुराज्यने आपले अस्तित्व ठळकपणे सिद्ध केले आहे. टोप पंचायत समिती मतदारसंघात जनसुराज्यचे मुकूंद पाटील यांनी ३३२३ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला. घुणकी पंचायत समिती मतदारसंघातून जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते यांनी विजय संपादन केला आहे.