मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जून होती. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद तसेच विविध प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, अंतिम मुदतीपर्यंत १ लाख ४५ हजार ७०८ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख १५ हजार ५३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे आणि आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना आता २ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी DTE महाराष्ट्र पोर्टल� ला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.