पुणे: वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येमागे तीन ठोस कारणे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात युक्तिवाद करताना केला आहे. या खळबळजनक प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने तब्बल १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून २१ आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत ३९ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे.
आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीत पूर्ण होणार आहे. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला औपचारिक सुरुवात होईल.
नियोजनपूर्वक हत्या
१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आरोपींनी मुद्दाम वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर वनराज आंदेकर यांच्यावर पाळत ठेवून पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. तपासात यापूर्वीही दोन वेळा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचा भक्कम पुरावा
पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली आठ पिस्तुले आणि सात कोयते जप्त केले आहेत. तसेच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, आवाज नमुन्यांचे तपास अहवाल आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणात वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, जावई जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर आणि टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड (सोम्या) यांच्यासह २१ आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
हत्येमागील तीन मुख्य कारणे
कौटुंबिक संपत्तीचा वाद
वनराज आंदेकर, त्यांची बहीण संजीवनी कोमकर आणि जावई जयंत कोमकर यांच्यात प्रदीर्घ काळापासून कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू होता. आर्थिक वर्चस्व आणि कौटुंबिक मतभेदांमुळे हा वाद अधिक तीव्र झाला होता.
अतिक्रमण कारवाईचा राग
हत्येच्या काही दिवस आधी पुणे महापालिकेने संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेतील दुकानावर अतिक्रमण विरोधी कारवाई करून दुकान पाडले होते. ही कारवाई वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय आरोपींना होता, ज्यामुळे त्यांच्या मनात संताप निर्माण झाला.
टोळीयुद्ध आणि जुना वैर
निखील आखाडे हा सोमनाथ गायकवाड टोळीचा सदस्य होता. त्याच्या हत्येचा आरोप आंदेकर टोळीवर होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, वनराज आंदेकर यांच्या राजकीय प्रभावामुळे आरोपींना जामीन मिळाल्याचा राग सोमनाथ गायकवाडला होता.
सरकारी वकिलांच्या मते, या तिन्ही कारणांमुळे सोमनाथ गायकवाड आणि कोमकर गट एकत्र आले आणि दोन्ही टोळ्यांनी संगनमताने वनराज आंदेकर यांची हत्या करण्याचा कट रचला.आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आरोप निश्चितीनंतर या बहुचर्चित खटल्याच्या सुनावणीला वेग येणार आहे.