मुंबई: महायुती सरकारमधील कथित अनैतिक वादांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवाळ यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित अनैतिक प्रकरणात आधीच अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असताना आता झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल होणे हे राज्याच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे गंभीर उदाहरण आहे.
ते पुढे म्हणाले की, जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्यांनी किमान नैतिकतेचे भान राखणे अपेक्षित असते. मात्र, झिरवाळ यांच्या प्रकरणामुळे त्या अपेक्षांना तडा गेला आहे. याशिवाय त्यांच्या मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर लाचखोरीच्या आरोपांमुळे आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही विलंब न करता झिरवाळ यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही नाव भोंदूबाबा प्रकरणात चर्चेत आले होते. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षातील पद कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी यावरही सवाल उपस्थित केला आहे.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. झिरवाळ आणि चाकणकर या दोघांनाही सर्व पदांवरून हटवण्याची मागणी त्यांनी यावेळी पुन्हा केली.