मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे व्यंगचित्र प्रसिद्ध करत उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे न्यायालयासमोर उभे राहून, ‘यांच्याकडे बाळासाहेबांचे विचारही आहेत, तेही गोठवा,’ असे म्हणताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भगवा ध्वज, धनुष्यबाण आणि वाघासह शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चित्र दाखवण्यात आले आहे. आकाशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि राष्ट्रहिताचे विचार हे शिवसेनेच्या राजकीय वाटचालीचा आधार राहिले आहेत. हे विचार कोणाच्या एका व्यक्तीच्या मालकीचे नसून शिवसैनिक तसेच महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचा दावा या व्यंगचित्रातून करण्यात आला आहे.
‘पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या राजकारणासोबत बाळासाहेबांचे विचारही गोठवणार का?’ असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने उबाठा गटाच्या भूमिकेवर उपरोधिक भाष्य केले आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेना गटांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.