शेतकरी म्हणाला, आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

महाराष्ट्र

बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने उरलीसुरली शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. मात्र, शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद आणि मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचनामे करण्यासाठी नको तर मैतासाठीच या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया येथील एका शेतकऱ्याने दिली.

या अवकाळी पावसामुळे फळबागासह पालेभाज्या त्यात टोमॅटो, पालक, कांदा, कैऱ्या सोबत ऊस देखील पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे. या रात्रीच्या अघोरी पावसाने शेतकऱ्याला खरंच आम्ही वाचतो की नाही असं देखील वाटू लागलं होते. मात्र फक्त नुकसान आणि जीवित हानीवर रात्रीचा पाऊस थांबला.