वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

महाराष्ट्र

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. अतिक्रमणाच्या मागे कार्यरत असलेल्या भूमाफिया, भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय संरक्षण देणाऱ्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रेल्वे, पालिका आणि इतर सरकारी जमिनींवर संगनमताने अतिक्रमणे उभी राहतात. त्यानंतर अनधिकृत झोपड्या व चाळी बांधून लाखो रुपयांचे व्यवहार केले जातात. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने वीज, पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

राजकीय संरक्षणामुळे अशा अवैध बांधकामांवर वेळेवर कारवाई होत नसल्याची टीकाही केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्ट्यांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात केवळ दंगलीत सहभागी व्यक्तींवर नव्हे, तर संपूर्ण अवैध साखळीवर चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत