पत्रकार संरक्षणासाठी अधिवेशनात प्रभावी काम करण्याची ग्वाही; डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुखांनी घेतली शिष्टमंडळासह विधान भवनात भेट 

मुंबई: राज्यात पत्रकारांवर होणारे विविध ठिकाणचे हल्ले, पत्रकारांना काम करताना जाणवत असलेली असुरक्षितता, त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात काम करता येईल. यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्रित या माहिती द्यावी, ज्यायोगे या प्रश्नाला न्याय देता येईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सांगितले.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद बाबळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी आज नीलम ताईंची विधान भवनात भेट घेतली आणि याबाबत निवेदन दिले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘पत्रकारांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयी सुविधा होणे गरजेचे आहे. अनेक पत्रकारांना विशेषत: ग्रामीण भागामध्ये काम करताना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागतो. या अनुषंगाने त्यांच्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू करणे, या बरोबरच अन्य सोयी सुविधा कशा देता येईल, यासाठी काम होणे आवश्यक आहे.

आजवरच्या झालेल्या पत्रकार हल्ल्यांबाबत तपास आणि आरोपींवर कठोर कारवाईची जबाबदारी विवक्षित पोलिस महानिरिक्षक यांच्याकडे देण्यात यावी. विविध ठिकाणचे पत्रकार हल्ले आणि त्यांच्याबाबत सुरू असलेल्या केसेस विषयी सविस्तर माहिती देण्यात यावी. आरोपींवर कारवाई झाली की नाही याबाबत माहिती द्यावी. आवश्यकता भासल्यास पत्रकारांच्या विषयात लक्ष घालण्यासाठी राज्य सरकार सोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत विशेष बैठक घेण्यात येईल,’ असे त्यांनी सांगितले आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या या प्रतिसादाने पत्रकारांच्या प्रश्नावर समाधानकारक स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली असल्याचे मत या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे.