मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठीच्या विविध बोली भाषा व लिपी याविषयीचे प्रदर्शन…

महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जो सर्व महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या दादर पूर्व येथील संदर्भ विभागात मराठी भाषेच्या विविध बोली, लिपी- इत्यादी विषयांवर विविध ग्रंथ व लेख यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले क “‘हे भाषाविषयक प्रदर्शन पाहून समाधान झाले, निरनिराळ्या बोली, लिप्या यातून भाषा कशी प्रवाही होत जाते हे कळते.सातशे वर्षांपूर्वी भाषेचा प्रश्न येत नव्हता. माणूस प्रवास करीत अगदी कन्याकुमारी ते कश्मीर चालला तरी भाषा येत नाही म्हणून त्याचं अडलं नाही. ब्रिटिशांनी सुधारणा करायला सुरुवात केल्यावर भाषेवर बंधनं आली भाषा बंदिस्त होऊ लागली. आपलं मातृभाषेवर प्रेम हवं. कोणत्याही भाषेतील 500वाक्यं आली की काहीही अडचण येत नाही.मराठी माणूस जिथे गेला तिथे सोबत मराठीतील शब्दही गेले.

राज्याराज्यांत असलेल्या मराठी भाषकांचा सरकारने भाषांतरासाठी उपयोग करून घ्यावा.’ अशी सूचनाही त्यांनी केली. याप्रसंगी साहित्यिक रंगनाथ पाठारे, जयप्रकाश सावंत, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, संस्थेचे विश्वस्त प्रताप आसबे, रवींद्र गावडे, उमा नाबर, विनायक परब,अभ्यासक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

“ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ लावलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे सर यांच्या हस्ते व्हावं हा अनोखा सुवर्णयोग आज ग्रंथालयात आला याचा मनस्वी आनंद आहे” असं संदर्भ कार्यवाह उमा नाबर म्हणाल्या. हे प्रदर्शन २८ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत पाहता येईल. तरी अभ्यासकांनी, साहित्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले आहे.