कारमधील लाखो रुपयांची रोकडही सुरक्षित
पुणे: पुणे शहरात माणुसकी, धैर्य आणि कर्तव्यभावनेचं दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वानवडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात नाल्यात कोसळलेल्या कारमधील चालकाचे प्राण लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ जीव वाचवला नाही तर कारमध्ये असलेली लाखो रुपयांची रोकडही सुरक्षितपणे चालकाकडे सुपूर्द केली.
वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळ भैरोबा नाल्यावरील पुलावर सोमवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालक गाडीतच अडकून पडला होता.
याचवेळी लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव पुलावरून जात होते. रस्त्यावर झालेली गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली. चौकशी केली असता खाली नाल्यात कार कोसळल्याची माहिती मिळाली. कारमध्ये हालचाल दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट नाल्यात उतरून मदतकार्य सुरू केले.
कारमध्ये चालक बेशुद्ध अवस्थेत होता आणि नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. यादव यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारची काच फोडून चालकाला बाहेर काढले. लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत त्यांनी स्वतःच्या रुमालाने नाकावर दाब देऊन रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी चालकाला नाल्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.
अपघातग्रस्त कारमध्ये सुमारे १ ते १.५ लाख रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले. चालक शुद्धीवर आल्यानंतर आशिष कुमार यादव यांनी संपूर्ण रक्कम प्रामाणिकपणे त्याच्याकडे सुपूर्द केली. नंतर एका टेम्पोच्या मदतीने जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.लष्करी अधिकाऱ्याने दाखवलेल्या या धैर्य, माणुसकी आणि प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.